Tuesday, July 27, 2010

चांदणे...

झुलते मनात माझ्या हळुवार चांदणे
अंधारल्या जिवाला आधार चांदणे

रात्री लपेटूनी तू आलीस घनतमा
गात्री तुझ्या झळाळे शृंगार चांदणे

नजरेत वीज ओली श्वासात चंद्रमा
ह्रदयात नादणारा झंकार चांदणे

प्यालो मिळून दोघे बेहोष होउनी
उदरात घे तुझ्या ते आकार चांदणे

तारा विझावल्या ये पूर्वेस लालिमा
त्या केशरात न्हाते अल्वार चांदणे

Wednesday, July 14, 2010

चाललो मी....

व्याकूळसे उसासे टाकीत चाललो मी
आवेग आसवांनी झाकीत चाललो मी

माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे
हा भार सोसवेना वाकीत चाललो मी

हा देह दग्ध होतो वणव्यात अंतरीच्या
वाटेवरी निखारे फेकीत चललो मी

मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या
प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी

नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया
का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ?

हा क्रूर जीवघेणा रस्ता मला हवासा
होऊनी पूर्ण त्याच्या अंकीत चाललो मी

Tuesday, July 13, 2010

मला एकटे का गमू लागले?

इथे लोक जेव्हा जमू लागले
मला एकटे का गमू लागले ?

सुखाने जना पोरके पाडले
व्यथांशी बिलोर्या नमू लागले

किती आंधळी वाट मी पाहिली
अता मात्र डोळे दमू लागले

तुला पाहिजे ते न मी देतसे
स्वताभोवती मन रमू लागले

मुक्या पापण्या काय ओलावल्या
फिक्या आठवांचे चमू लागले

नुरे वासना कामना जीवना
दिवे अंतरीचे शमू लागले

Wednesday, July 7, 2010

नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

भाग्य दिसते जे समोरी ते मला लाभेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

नाहि दिसली ती कधी मग भेटणे अमुचे कुठे?
भाबड्या जीवास का मग आतुनी आशा फुटे?
काय पडली भूल ही माझ्या मना उमगेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

का सकाळी भास होतो पैंजणांचा अंगणी?
अन् चुलीच्या जवळ वाजे काकणांची किणकिणी
चिमूटभर त्या कुंकवाचे भाग्य मग उजळेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

मांडले शब्दात मी ह्रदयात जे हुंकारले
फक्त आशा एक की मजला दिसावी पाउले
या मनीचे हे मनोगत त्या मनी पोचेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

Tuesday, July 6, 2010

बाजार फायद्याचा तोटे कुठे मिळावे

सर्वस्व अर्पिणारे नाते कुठे मिळावे
बाजार फायद्याचा तोटे कुठे मिळावे

चचपून पाहसी का प्रत्येक माणसाला
डोके मुळी मिळेना फेटे कुठे मिळावे

नाठाळ खेटणारे मजला इथे अघोरी
त्या हाणण्या कपाळी सोटे कुठे मिळावे

अस्फुट आठवांचा हा मोडका पसारा
अडगळित कोंबण्याला पोते कुठे मिळावे

लाचार हे शिळेचे परमेश भग्न दिसती
मग 'हाडपेर'वाले नेते कुठे मिळावे

येथे क्षणाक्षणाला होतात वाद युद्धे
जग पूर्ण जिंकणारे जेते कुठे मिळावे

माझी अगाध दु:खे ऐकून सांत्चनाला
दर्दी तुझ्याप्रमाणे कविते कुठे मिळावे

Friday, July 2, 2010

सावल्या

कितीक सुंदर सावल्या येथील
परि त्या बांधिल
aaaaaaaaaaaaaदेहासंगे

स्वत्व वा जाणीव तयास कोणती
कोठली हो भक्ती
aaaaaaaaaaaaaत्या माहित

जेथे जाई देह तेथे त्या धावती
अंधाराची भीती
aaaaaaaaaaaaaमात्र त्यांना

स्वानंदा तू सोडी अंधाराची वाट
सावली पायात
aaaaaaaaaaaaaघोटाळेल