Tuesday, August 31, 2010

मंगलवार्ता कळेल आता

मंगलवार्ता कळेल आता
भाग्य रेशमी मिळेल आता

एकटेपणा जेथे थिजला
एकरुपता रुळेल आता

या ह्रदयीचा त्या ह्रदयीला
स्नेह आपसुक जुळेल आता

दुडुदुडु धावत अंगणातुनी
बाळमुकुंदा पळेल आता

रंगामधुनी रांगोळीच्या
हात चिमुकला मळेल आता

कल्पतरुंची बने दावण्या
वाट सुखाने वळेल आता

अमृतधारा भिजवतील मन
वषार्वच तो छळेल आता

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Wednesday, August 25, 2010

मी कुठे आता तिच्या दुनियेत आहे

जीव माझा जिंदगानी घेत आहे
क्षणक्षणाने मज सुळावर नेत आहे

मी भिऊनी वागतो प्रस्थापितांशी
मज पुरे लुटणे तयांचा बेत आहे

हाय फसवी क्रूर दुनिया पारध्यांची
क्लेश कानी पाखराचा येत आहे

हात देती सावराया माणसे जी
पाय त्यांचा सर्वदा गर्तेत आहे

सोय केलेली सुरेने वेदनेची
आगळी जादू तिच्या धारेत आहे

हासते ती बोलते अन लाजतेही
मी कुठे आता तिच्या दुनियेत आहे

पूर्ण गेली लाज नीती ये फकीरी
प्राण गेला फक्त उरले प्रेत आहे

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Tuesday, August 10, 2010

बनविले मामा कधी

हुंदक्यांना रोखणे जमलेच ना आम्हा कधी
ना मिळाली प्रेयसी अन आमुच्या प्रेमा कधी

रोज जातो राउळी अन ठेवतो मी दक्षिणा
हात जोडून मागतो मी प्रेयसीची प्रार्थना
खंड ना एका दिसाचा रोजच्या नेमा कधी

ये कधी युवती कुणी हासून लाजून बोलते
नाव पुसता मात्र मागे ‘सौ’ तिच्या हो लागते
आमुचे ’सौ’भाग्य ना ये आमुच्या कामा कधी

हाय जगतो जीव का हे ना कळे माझे मला
जात स्त्रीची बेरकी कळलीच ना वेड्या तुला
बांधली राखी कुणी तर बनविले मामा कधी

-स्वानंद

गर्दी तुझ्या क्षणांची दाटे सुनी सुनी

मैफल तुझ्याविना रे वाटे सुनी सुनी
छेडे सतार जेव्हा बोटे सुनी सुनी

चैतन्य सर्व लोपे विरहात राजसा
बस अंतरात ज्वाला पेटे सुनी सुनी

मी ओळखून आहे ती पाउले तुझी
पण वाट अंत पाहे भेटे सुनी सुनी

विणुनी रुपेर स्वप्ने हा दिवस संपला
उरली उदास रजनी फाटे सुनी सुनी

अश्रू मला धरेना डोळ्यात रोखूनी
गर्दी तुझ्या क्षणांची दाटे सुनी सुनी

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Monday, August 9, 2010

बेकरार बैठे है

जिधर देखो इश्क के बिमार बैठे है,
हजारों मर चुके, सैकडों तैयार बैठे है!

हमने भी खूब इंतजार किया मगर
पता चला हम तो बेकार बैठे है

इश्क की परछाईया तो छु ना सके
थाम के दिल बेकरार बैठे है

हाय कोई तो हमारी किमत लगाए
आंखे बिछाए सरे बाजार बैठे है

तडपने की तो अब आदतसी है हम को
दामन मे लिये अंगार बैठे है

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

टीप: पहिल्या २ ओळी जालावर सापडल्या, आवडल्या.
मग बाकीच्या आपोआप सुचल्या...

Sunday, August 8, 2010

होईल कधी गे भेट ?

होईल कधी गे भेट ?
कासावीस हा प्राण कधीचा कंठाशी ये थेट

ओझरते मी तुला पाहिले
थार्यावरचे चित्त उडाले
मनोरथांचे चढले इमले
क्षणात स्वप्ने किती पाहिली कितीक रचले बेत

ओठांवरती शब्द न येती
मनात पण पाझरते प्रीति
परतून जेव्हा पडेल गाठी
नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत

एकच आशा येशील गे तू
जुळतील धागे जुळतील हेतू
केव्हा होईल भेट परंतू
अधीर आतुर ह्रदय बिचारे तुझीच चाहूल घेत

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Thursday, August 5, 2010

राधिकेची आसवे का रोधिती श्यामा कधी ?

हुंदक्यांना रोखणे जमलेच ना आम्हा कधी
ना मिळाली प्रेयसी अन आमुच्या प्रेमा कधी

मी उन्हे कुरवाळली अंगात धग ती राहिली
चिमुटभर ना सावली मग लाभली जन्मा कधी

सोडुनी ती वाट जाते कोरडा मी राहतो
धार ओली स्पर्शली ना रापल्या रोमा कधी

पूस डोळे जाण वेड्या प्रेम मागे आहुती
राधिकेची आसवे का रोधिती श्यामा कधी ?

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Monday, August 2, 2010

मधुचंद्र

आता झाली वेळ फुलांची
नभात दाटे नीळ फुलांची

दिवस फुलांचा रात्र फुलांची
सांज खुळी वेल्हाळ फुलांची

दिठी फुलांची मिठी फुलांची
उरि हुरहुर ओढाळ फुलांची

श्वास फुलांचे भास फुलांचे
वाणीही गंधाळ फुलांची

मीहि फुलांचा तूहि फुलांची
गळ्यात विलसे ओळ फुलांची

कोठून येतो सुगंध हलके
कवितेची या नाळ फुलांची