Friday, September 24, 2010

अंत

स्पंदने डोळ्यात | सांडला नि:श्वास |
संपला प्रवास | दिगंताचा ||

थांबले ना थोडे | प्राण हे उडाले |
दु:खात बुडाले | घरदार ||

एकटा चालला | सोडूनी सोयरे |
साथ फक्त उरे | पावकाची ||

शांतवी शेवटी | माता गोदावरी |
नात्यांची उधारी | पुरी फिटे ||

'स्वानंदा' तू जाण | नश्वर जगाला |
आणि शाश्वताला | चित्ती धरी ||

Tuesday, September 21, 2010

सारथी

लगाम हाती आयुष्याची डोळ्यामध्ये क्षितीज वेडे
असा सारथी आयुष्याचा चौखूर उधळी अपुले घोडे

दर्‍या लागल्या दु:खांच्या कधि स्वर्ग सुखांचे पर्वत सुंदर
नजर विषारी काळाची अन करते माझा प्रवास खडतर

'कर्ण' जरी मी नाही ठरलो फिकीर नाही त्याची मजला
पूर्ण राहिलो प्रामाणिक मी माझ्या गहिर्‍या आयुष्याला

-स्वानंद

Sunday, September 19, 2010

छोट्या बहराची गझल

टाक थोडे
हाक थोड

दाविसी का?
झाक थोडे

ताठ का तू?
वाक थोडे

लपव भांडे
ताक थोडे

नथ बुलाखी
नाक थोडे

वाट लंबी
चाक थोडे

पिंड शिवण्या
काक थोडे

आग खोटी
खाक थोडे

पोर वाया
धाक थोडे

ई-जमाना
डाक थोडे

ताक मोठे
डाक थोडे

-स्वानंद

Tuesday, September 14, 2010

आभाळ लागले मिळू

आता कुठे उजाडले आभाळ लागले मिळू
सविता प्रकाश लागला या चांदण्यात विरघळू

वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला
तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू

येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये
प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू

ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला
माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू

नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे
एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Tuesday, September 7, 2010

फितूर पाऊस

निरन्जन वहालेकर यांची मूळ रचना इथे पहा. खाली आहे ती मी केलेली सुधारीत रचना.

http://www.misalpav.com/node/14288

बरसत होता श्रावण अगणित,
ऋतू प्रेमाचा होता फुलला,
विजेसारखी प्रकटलीस तू,
इंद्रधनू स्वागतास सजला.

पाऊस रिमझिम, तू ओलेती,
तन-मन माझेहि ओलावे,
केस झटकणे तुझे त्या क्षणी,
अगणित मोती मी झेलावे

उधळत रंग असे प्रीतिचे,
बिलगलीस तू अवचित मजला,
ऊर पेटवू लागे पाऊस
फितूर झाला ऋतूचक्राला

Monday, September 6, 2010

कोणीच ना पहाते...

कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा
नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ?

ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा
जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा

संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो
गेली उडून माझ्या ओठावरील भाषा

माझे अबोलणेही भासे मला विषारी
कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा

आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला
माझा अनाम साथी असला सुना नकाशा

तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची
तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Thursday, September 2, 2010

निरोप

27 ऑगस्टला मुकेशचा स्मृतीदिन झाला. त्याच्याच एका गाण्याचा भावानुवाद. पहा ओळखते का...

स्वप्ने निमाली गळाले विसावे
तुझ्या हंदक्यांना कुणी सावरावे?

वचने विसर तू विसर प्रेमभाषा
बदलू शके का कुणी हस्तरेषा
ऐश्या जगाला कशाला स्मरावे?

आयुष्य पुरते सखे दग्ध झाले
झुरणे सुखांच्या ललाटी निघाले
अश्रू मला दे तुला सुख उरावे

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/