Saturday, October 30, 2010

माझ्या व्यथे...

परतून सांग तुजला बोलावणार कैसा?
नाहीस तू मनाला समजावणार कैसा?

पुरते अटून गेले डोळ्यामधून पाणी
कल्लोळ भावनांचा मी दावणार कैसा?

जहरी तुझ्या स्वरांनी शिवलेस ओठ माझे
संवाद अंतरीचा पण थांबणार कैसा?

चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली
भेगाळला उन्हाळा ओलावणार कैसा?

कंटाळलो कितीही बेरंग जीवनाला
आयुष्य तू दिलेले अव्हेरणार कैसा?

मी हात लावल्याने कोमेजली बिचारी
निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा?

ना सांगता कधीही येतेस तू समोरी
माझ्या व्यथे तुला मी हुलकावणार कैसा?

- स्वानंद

Sunday, October 17, 2010

नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

ज्याची मनास भीती तेची घडे अताशा
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा

दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?

मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने
त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा

दूरातूनी विराणी सनई उदास गाते
ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा

इतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे-
मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा?

इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने
लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा

हुंड्या परी अताशा गेल्या जुन्या प्रथाही
दिसतात संपलेले हिरवे चुडे अताशा

-स्वानंद

Wednesday, October 6, 2010

स्वप्नातले स्वप्न

पायात रुतावा काटा
ओठातून आह उठावी
अन लकेर माझ्या मनिची
ओठात तुझ्या उमटावी

सावळ्या सुखांचे स्पर्श,
मज वाटेवर भेटावे
चांदण्यात न्हाल्या रात्री
निशीगंध उरात भिनावे

वाटेवर अंथरलेली
आतूर फुले उमलावी
चाहूल तुझी घेण्याला
कानांना दृष्टी यावी

डोळ्यात मिसळता डोळे
हरपून भान विसरावे
स्पर्शातील चंद्रांनी मग
प्रीतीचे गाणे गावे

- स्वानंद