Saturday, November 27, 2010

मैत्रीणीस...

फुलण्यासाठी रान दिले तुज गर्द मोकळे चितार सृष्टी
नभांगणातून तुझ्या मनीच्या रंगछटांची होवो वृष्टी

चित्र रेखिता भान हरावे हरपून जाव्या सर्व जाणीवा
दु:खाचाही विसर पडो तुज सुखालाही तव वाटो हेवा

माझ्यापाशी नाही औषध सापडेल पण यात कदाचित
झटकून देशील ज्यावेळी तू तुझ्या मनातील मळके संचित

- स्वानंद

निरोप

पुन्हा एकदा हासशील का तेजस राजस लोभसवाणे
पुन्हा कधी गे भेट आपुली होईल आता देवच जाणे

विलग जाहले मार्ग आजला
विलग पाखरे दोन दिशाला,
भरती नवथरती उड्डाणे

कधी भेटलो कधी हासलो
कधी रुसलो कधी भांडभांडलो
मैत्री जपली शुद्ध मनाने

भाग्य तुझे तेजाळ फुलावे
सौख्य जगातील सर्व मिळावे
देवापाशी हेच मागणे

- स्वानंद