Saturday, December 31, 2011

प्रीतपूर्ती

आवेग वाढला बांध फुटे तो आज
डोळ्यांतील आता उडून गेली लाज
अंगाला भिडले अंग सोडूनी रीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

ही कुठली आली झिंग कळेना दोघा
हा कुठला त्यांना बांधून ठेवी धागा
गुंफले तयांनी शब्द सुरांनी गीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

क्षण निघून गेले उरे भावना हाती
रुजवली जिने आजन्मांची ही नाती
हा विरहच आता ह्रदयांना जाळीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

विरहातच फुलते प्रीति या जगतात
विरहातच जगती प्रेमिक जगि दिनरात
विरहात दरवळे मधु-मिलन संगीत
परिपूर्ण होतसे दोघांचीही प्रीत

- स्वानंद

Sunday, November 20, 2011

दोन बालगीते

-१-
समुद्रावर गेलो फिरायला म्हणून
लाटांवर चमकत होतं ऊन

दूरवर दिसली खेळकर होडी
लाटांवर डुले ती थोडी थोडी

जवळ ती येताच सरला भास
मेलेल्या माश्यांचा आला वास

-२-
ताईच्या गाडीवर मागं बसून
फिरायला निघालो नटूनथटून

ऐटीत सोडून मागे पाय
उलटा बसलो तर म्हणते काय -

"हलू नको, डुलू नको, करु नको खोडी"
मग कळलं बिच्चारीला येतच नाही गाडी

- स्वानंद

Saturday, October 1, 2011

प्रीतिसंगम

पेंगुळलेल्या शांत नदीवर किरण रविचे पडती जेव्हा
लहरीतून चैतन्य सळसळे, हवेत येतो नवा ताजवा

स्थितप्रज्ञ त्या अचल डोंगरी मेघ थांबती थोडे थोडे
जणू चराया तिथे थांबले शुभ्र, सुरांचे, सुनील घोडे

हिरव्या कुरणातूनी वाहतो प्रकाश अविरत सर्व दिशांनी
प्रवाहास त्या बांध घालण्या जागृत होती पक्षी प्राणी

सॄष्टी झटके जीर्ण पांघरुण जुनाटल्या निस्तेज निशेचे
किलबिल झडते सा-या गगनी स्वागत करण्या नव्या उषेचे

पार उधळला गुलाल वरती आकाशाच्या छता टेकतो
ठिणगीमधूनी आनंदाच्या गगनामध्ये सूर्य पेटतो

तेजा प्राशुनी पुलकित होती सह्यकन्यका अमृतवाही
पोक्त थोरली 'कृष्णा', अवखळ स्वैर 'कोयना' मिसळून जाई

दो भगिनींची अभंग माया जगात दुसरी नाही यासम
साक्ष देत 'करहाटक' ग्रामी अजून आहे 'प्रीतिसंगम'

- स्वानंद

Saturday, September 17, 2011

बेडी...

या झोक्यावर त्या झोक्यावर थोडेसे खेळून
लेक चिमुकली दमून बसली बाजूला येऊन

धर्मबिंदू ये भाळावरती थोडी घाबरली ती
अवतीभवती मुळी न दिसती ओळखीच्या आकृती

"कोठे आई, कोठे बाबा गेले मज टाकून?"
डोळे झाले टचकन ओले गळा येई दाटून

क्षणात आले बाबा मागून हळू झाकती डोळे
त्यांच्या हाता लागे दहिवर विरही ओघळलेले

कवेत त्यांच्या शरासारखी घुसे लेक ती वेडी
दुरुन आई पहात राही 'वात्सल्याची बेडी'

- स्वानंद

Tuesday, August 30, 2011

मना वर्तमानात तू रे जगावे

अघोरी असो वा असो भाग्यशाली
नसे 'भूतकाळा'स कोणीच वाली
फुका आठवांनी कशाला झुरावे?
मना वर्तमानात तू रे जगावे

नसे शाश्वती हाय पुढल्या क्षणाची
उगा भिस्त का दाविसी रे युगांची?
"अता वाटते ते अताची करावे"
मना वर्तमानात तू रे जगावे

टळे वेळ कोणा कुण्या कारणाने
गळे की पहा तो क्षणाने क्षणाने
रिते पात्र अपूले कसे तू भरावे?
मना वर्तमानात तू रे जगावे

- स्वानंद

Sunday, August 14, 2011

सारखं वाटतयं...

रणरणती दुपार मनातही उन्हं
तापलेली धरती तापलेली मनं
सरसरुन अवचित यावा शिडकावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

ढगांच्या सावल्या पडाव्यात वरुन
क्षणात ऊन जावं पळून
वा-याचा वारु सुसाट सुटावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

भरुन भरुन यावं आभाळ
विजांचे वाजावे चंदेरी चाळ
सुर्याचा ताप क्षणात विझावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

पावसाची लागलेली कधीची आस
मातीचा यावा पुन्हा सुवास
रिमझिम रिमझिम धाराही नाचाव्या
सारखं वाटतयं पाऊस पडावा

भिजावी शेतं साचावं पाणी
डोंगरापल्याड सप्तरंगी कमानी
रंगांचा तो गोफ ह्रदयात उमटावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

झरझर झरझर झरु दे धार
तहानल्या धरतीच्या जिभा हजार
आतुर कधीची ती घेण्या विसावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

मीही घेईन उडी चिंब भिजवील तो
(बाकी काही नाही, निदान अश्रू तरी लपवील तो)
आठवांचा बांध पावसात फुटावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

आला तो आला सोसाट्याचा वारा
तृषार्त देहावर बरसल्या धारा
आतून बाहेरुन ओलावाच ओलावा
सारखं वाटतयं...

- स्वानंद

Saturday, August 13, 2011

मनाचे उसासे मनापाशी

मनाची कवाडे उद्विग्न उदास ।
कशाला मी श्वास घेत आहे ॥

बड्या या घराचे पोकळच वासे ।
मनाचे उसासे मनापाशी ॥

आता ना कुठेही जराही आसरा ।
गोतावळा सारा दुरावला ॥

अंधार बळावे आधार लोपला
'स्वानंद' हरपला 'स्वानंदा'चा ॥

Friday, August 12, 2011

जाम...!

करमत नाही तिज आता
माझ्यावाचून थोडेही
माझेच व्यसन तिज लागे
ना दारु मज सोडे ही

ती पूर्ण भिने माझ्यात
मी खोलखोलसा जातो
कोणात बुडाले कोण
ना सुटते मज कोडेही

Thursday, July 21, 2011

खंत

स्वप्न नाही एकही जमले मला साकारणे
देत गेलो शेवटी मी कारणांना कारणे

चढविला आहे मुलामा हासरा ओठांवरी
काळजाला ना जमे जखमा जुन्या नाकारणे

धावतो पाठीस माझ्या दावतो काठी मला
'काळ' करतो काम त्याचे मेंढरा हाकारणे

-स्वानंद

Sunday, July 10, 2011

तुझी आठवण...

तू जिथे गे तिथे हे ऋतू नाही का?
हासणा-या प्रिये तारका नाही का?
बरसणा-या नभी नाचते वीज का?
हुरहुरीची उरी दाटते सांज का?

ही उदासीन दुनिया सदा सर्वदा
काळजाला कुणी सावरावे इथे?
एक वेड्या जीवासाठी आयुष्य का
वंचनांनी खुळ्या घालवावे इथे?
मात्र अपुल्या क्षणांची जराही तुला
सप्तरंगी सुवासी स्मृती नाही का?

काळजातील कळ गाई गीतातूनी
साद दे तू मला शांतवाया तिला
रात्र सुनी सरे आणि मी एकला
जीव माझा तुझ्यासाठी आतुरला
फक्त डोळ्यातूनी भेटलो कैकदा
त्या दिसांची तुला गे स्मृती नाही का?

- स्वानंद

मूळ गीत: http://www.youtube.com/watch?v=Ac9jPAIOV9Q

Friday, July 8, 2011

का गडे झुकल्या पापण्या खाली?

का गडे झुकल्या पापण्या खाली?
गोरट्या गाला का चढे लाली

रंग संध्येचे त्या अनंताने
रेखिले भोळ्या लाजर्‍या गाली

मंद सुटलेला केशरी वारा
गंध उधळीतो कुंद भोताली

भेटलो होतो बोलण्यासाठी
शब्द विरलेले थांबली बोली

दूर ऐकू ये राऊळी घंटा
तेथ ती मीरा कृष्ण ओवाळी

- स्वानंद

Saturday, June 18, 2011

मुके बोल

दिगंतात विरल्या विराण्या थोरांच्या ।
तुझ्या मुक्या बोलांचा । ठाव कोणा ॥

वरुनी भासतो स्वस्थता आराम ।
अंतरी जखम । भळभळे ॥

सोसवेना ताण देह विरलेला ।
नाही शिवायाला । ठिगळही ॥

स्वानंदा तू आता स्वधर्माला ताडी ।
उधळणे सोडी । चौखुरांनी ॥

- स्वानंद

Thursday, June 2, 2011

तुला सांगायचे राहिले..

प्रिये,

तुला सांगायचे राहिले..
काल चालत घरी येत होतो..
तेव्हा वाटेत..
देव भेटला..
म्ह्णाला "मी प्रसन्न झालोय, काय पाहिजे ते माग तुला?"

मी मनात म्हटलं
"देवा,
तू प्रसन्न झाला आहेस,
हे तिने होकार दिला
तेव्हाच समजले होते"
:)
"काय पाहिजे"
देव विचारतच होता

त्याला म्हटले...
"आता काही करायचेच असेल
तर एक काम कर....
तुला हवे ते रुप घेता येते म्ह्णे
मग माझेच रूप घे...

आणि जा माझ्या प्रियाजवळ
तिला सांग मी आलोय...

तिला किती आनंद होईल सांगू?
काय करु काय नको असे होईल तिला...

भांबावेल, गोंधळेल...
पण तू तिचे डोके शांतपणे तुझ्या खांद्यावर ठेव...
पाठीवरून मायेने हात फिरव...
आणि तिचे मन भरेपर्यंत पाहून घेऊ देत तिला..
तिचा बांध फुटेल कदाचित...

रडू दे तिला...
मनसोक्त...

तू आधार आणि माया दोन्ही देत रहा....

बस..एवढंच कर...
बाकी काही नको..

- स्वानंद

Thursday, May 19, 2011

आयुष्य पार सरलेले...

तडजोडी करता करता
आयुष्य पार सरलेले
स्वप्नांची वाफ उडाली
कोरडे-शुष्क उरलेले

आता न वळे पाऊल
वाटेवरती गाण्यांच्या
कंठात रुते आवाज
ओठही बंद शिवलेले

हे दुःख आत ना मावे
बाहेर येतही नाही
पाहून पोरकी स्वप्ने
डोळ्यांशी डबडबलेले

माझे मन मोठे कोडे
सुटता न सुटे थोडेही
बाहेर दिसे स्वच्छंदी
आतूनी बुरसटलेले

खांद्याला घेऊन ओ़झी
मसणात रोजची वारी
एकेका दगडा खाली
एकेक स्वप्न पुरलेले

- स्वानंद

Saturday, May 14, 2011

वेडेपणा...

काळीज माझे गुंतले अन भोवला वेडेपणा
’शहरात या तू एकटा!’ म्हणला मला वेडेपणा

रात्री कुणी हाकारले ओळख मला ना लागली
मी बोललो ’तू कोण रे?’ तो बोलला ' वेडेपणा!'

एकांत हा दःखी करे वणवण जिवाची ना टळे
आम्ही पुरे कंटाळलो कंटाळला वेडेपणा

माझ्या रथाला हाकता तू सोबती तू सारथी
ना माहिती आहेस तू माझ्यातला - वेडेपणा!

साकी विचारे सारखी ’आहेस का रे तू सुखी?’
ओलावल्या दुःखातुनी मी कोरला वेडेपणा

स्वप्नात माझ्या सारखा तो चंद्र येतो एकटा
माझ्या परी त्याच्या जगी आकारला वेडेपणा

- स्वानंद

प्रेरणा:
http://www.youtube.com/watch?v=qH5q-v8tvF4

Friday, May 13, 2011

अनोळखी...

देऊ नको मला तू नावे अनोळखी
का रोज मी स्वतःला व्हावे अनोळखी?

मी त्यागिले सुखाने सन्मित्र सोयरे
मागून सावली का धावे अनोळखी?

गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे
त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'?

या रोजच्याच वाटा मी चालतो तरी
वाटेत लागणारी गावे अनोळखी

वैशाख तापलेला वणवा उरी जळे
ओठात गीत ओले यावे अनोळखी

- स्वानंद

Saturday, April 16, 2011

:(

कामाने भरलेले सगळे लोक
मनेही कामाने भरलेली चोख
कोणापाशी ओतावं आत जे साठतयं?
मला फार एकटं वाटतयं..

दारे-खिडक्या सताड उघड्या
बाहेर पडू देत नाहीत अदृश्य बेड्या
खिडकीतल्या आभाळात मळभ साठतयं...
मला फार एकटं वाटतयं...

गंजलेलं दार करकरतयं फार
मनात आणतयं उदास विचार
टाळू ज्याला जातो तेच येउन गाठतयं
मला फार एकटं वाटतयं..

मिणमिणता उजेड पेटलेली वात
चाचपडतो ठेचाळतो अंधारात
डोळ्यापुढचे भविष्य गोठतयं
मला फार एकटं वाटतयं..

:(

Tuesday, April 5, 2011

रंगात तुझ्या रंगते

रंगात तुझ्या रंगते
स्वप्नात आज जागते...

अधरांवर पावा तुझ्या
मन माझे नादावते...

स्पर्शात पाझरे सुधा
शतजन्मतृषा भागते...

उमलती नव्या भावना
बोबडे सुख रांगते...

Wednesday, March 30, 2011

बोलू नकोच काही....

माझ्या मनात आहे तुझिया मनात आहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

शब्दामधून नाही मज शक्य सांगणे ते
जन्मात एकदा ही सौभाग्य-भेट होते
हा विरह जीवघेणा दोघांस जाचताहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

ओठावरील भाषा मौनाळली तरीही
डोळ्यामधून माझ्या वाचून भाव घेई
दाटे उरी तुझ्या ते माझ्या उरात आहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

झुरतो तुझ्याविना मी येशील गे कधी तू
पुरते लुटून मजला घेशील गे कधी तू
त्या रेशमी लुटीची मी वाट पाहताहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

- स्वानंद

Sunday, March 20, 2011

ओले परीस...

डोळ्यामधील आसू परतून ना गळावे
धुंदीत मी जगावे, धुंदीत मी मरावे

आता न जाणवावी दुःखे उदासवाणी
’दारू’ परीस ओले जखमांवरी फिरावे

तार्‍यांत वावरावे सहवास चांदण्यांचा
डोळे उभ्या जगाचे माझ्याकडे असावे

काळोख दाटलेला आहे दहा दिशांनी
श्वासात ध्यास आहे तोचि प्रकाश दावे

आत्म्यात राम राहे, आत्म्यात कॄष्ण आहे
हे राम-कॄष्ण आता बाहेरही दिसावे

- स्वानंद

Wednesday, March 9, 2011

अजून राधा....

यमुनेचे जळ कंप पावते ह्रदय तिचे धडधडते रे
मुके हुंदके कानी पडती अजून राधा रडते रे

कशास रचला रासरंग तू, सूर वेणूचे आळवले
नंदनवन का माझ्यासाठी यमुनातीरावर रचले?
कदंब-शाखेवरची कोकीळ झोपेतच थरथरते रे

मन लोणी मम तन लोणी, नयनामधले द्रव लोणी
तू गेल्यावर लपून आता चोरायाचे ते कोणी
तू ना येसी, वेडे मन पण तुझीच चाहूल घेते रे

रंग फिके या होळीचे शाम तुझ्या रंगापुढती
नयना मधले काजळ वाहे अश्रू सावळे ओघळती
रंगामध्ये तन भिजते मन भिजण्या आतुरते रे

- स्वानंद

प्रेरणा:
http://manmanjusha.blogspot.com/2011/02/blog-post_18.html#axzz1G93ON3Ge

Thursday, March 3, 2011

पोहरा

आड ओसंडून वाहे भिजे सानुला पोहरा
त्याच अमृतधारेचे अर्ध्य देतसे भास्करा

देहभान हरपले नुरे शिणवटा सारा
गारव्याच्या झुळकांनी हले बांधलेला दोरा

गती चक्राची बिलोरी आवर्तन घडवीते
कधी वर कधी खाली, कधी मधी अडवीते

पाणी पोचावे शिवारी खळखळा पटातून
हिरवाई पसरावी पानतून रानातून

- स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com

Friday, January 28, 2011

सुधारणा

दारे-खिडक्या सताड उघड्या
बाहेर पडू देत नाहीत अदृश्य बेड्या
खिडकीतल्या आभाळात मळभ साठतयं…
मला फार एकटं वाटतयं…

:(

-स्वानंद

आकाशात बसलेली बोळकी आज्जीबाई
तिला म्हणावं करत जा थोडी साफसफाई…
झाडू फिरव आकाशात, बघ मळभ सरतंय…
आज्जीबाई आहे ना, मग कश्श्याला एकटं वाट्टंय?!!

-अनुज्ञा

म्हटलं मी आज्जीला “झाडू जरा मार”
“मला नाही वेळ” -म्हणे “कामे आहेत फार”
कुरकुरणार्‍या आज्जीशी हुज्जत कोण घालणार ?
एकटं वाटायचं ते एकटंच वाटत राहणार…

-स्वानंद

कुरकुरणाऱ्या आज्जीला दे लिम्लेटची गोळी…
काम जरा राहू देत, आधी शोध तिची कवळी…
गोष्ट सांग एखादी, म्हणावं, झाडू मग नंतर…
कुरकुरणारे आजी-नातू, दोघांत नाही अंतर!!

-अनु्ज्ञा

नेहमी का ‘मी’च चांगले वागायचे?
दुसर्‍याच्या मनासाठी स्वत:चे मारायचे
आजी नको, गोष्ट नको, नको कोणी कोणी
एकटचं इथे राहू दे मला वेड्यावाणी

-स्वानंद

ठीक आहे…
ठीक आहे तुला मुळी नको कोणी कोणी…
आता मीही धाडणार नाही शब्दांमागून गाणी…

-अनुज्ञा

कुणाला कशाला उगाच माझा त्रास?
माझाच मला लखलाभ तुरुंगवास…

-स्वानंद

नको नको करता प्रसविता…
ही घडतेच पुन्हा कविता…
रुसल्या कवीला कशास पुसता…
हसतो पडता, रडतो हसता…

-अनुज्ञा

हसणे रडणे पडणे झडणे । याला म्हणती येथे जगणे ।
असे झिजूनी वाया जाणे । गंजून जाण्या परि बरे ॥

-स्वानंद

कितीक पडले, कितीक झडले
मानवरूपी मूषक येथे
जगले नाही...जन्मून मेले
त्यांच्या सडल्या कलेवरांवर..
काळ हासुनी पुढे सरे..

ज्याच्या शब्दे धरणी पुलकित।
काळ ही ज्यास्तव झाला कुंठित।
ऐशा मनुजा विश्वचि अंकित।
मग कंटाळ्या समय नुरे॥

नेत्री ज्याच्या स्वप्ने जळती होऊनिया अंगार...
त्याच्या पुढती विरून जातो कंटाळा अंधार

-अनुज्ञा

मनात झरते आशा निर्मळ स्वर्गंगेची धार
उरी उपजती हिमालयाहून उंच बुलंद विचार
नव्या युगाची मशाल हाती मुखी नवा एल्गार
त्याच्या पुढती विरून जातो कंटाळा अंधार...

:)

-स्वानंद

या सुधारणावादाच्या मूळ कवयित्री इथे सापडतील….

http://anujnainmarathi.wordpress.com/

मनगुज.. मनाचं सुरेल अलगुज…

Friday, January 21, 2011

सखे...

तू चालतेस आणि चैतन्य ये जगात
ऋतूचक्रही फिरे अन शिशिरात हो वसंत

तू थांबतेस आणि आकाश स्तब्ध होई
वर थांबतात मेघ टिपण्या तुझी निळाई

तव बोलणे मधाचे जणु चांदरात व्हावी
एकेक शब्द मजला स्वप्नात स्वप्न दावी

तू हासता कळीचे तारुण्य धन्य होते
ती हासण्यास जाते हसण्यात फूल होते

- स्वानंद

Friday, January 7, 2011

नाही

नाही मला कधीही नव्हते म्हणायचे
'नाही'च शब्द पण का ओठात यायचे ?

अवरुन घेत जातो माझ्या मनास मी
तू यायचे त्वरेने ते विस्कटायचे

मी झेलतो निखारे वणव्यात तू उभी
कोणा कुणास आता मग शांतवायचे ?

घालीत भीक नाही मी संकटा तुला
तू सारखे कशाला दारी फिरायचे ?

माझ्याच काळजाचे खत घातले तरी
कोमेजती ऋतू का माझे फुलायचे

मजला उसंत नाही आहेस व्यस्त तू
आभाळ फाटलेले कोणी शिवायचे ?

- स्वानंद

Tuesday, January 4, 2011

नको करू तू प्रीत...

नको करू तू प्रीत
ज्यावर ना अधिकार तुझा त्या का होसी मोहीत ?

मुग्ध रूपाने भुलवी कोणी
कुणी बोलते मंजुळ वाणी
कोणी येई पथात पसरे हात तुला अडवीत
............... नको करू तू प्रीत

खांद्यावरती ठेवून डोके
कोणी घेई मनात झोके
मैत्रीच्या बुरख्यात लपवली ही फसवी जनरीत
............... नको करू तू प्रीत

आयुष्याची पकड ना तुला
बहरून येण्या सवड ना तुला
फुकाच का चुचकारसी ह्रदया स्वतःस मग फसवीत ?
............... नको करू तू प्रीत

- स्वानंद