Saturday, June 29, 2013

सारखे बोलावयाचा काय चाळा लागला ?

सारखे बोलावयाचा काय चाळा लागला ?
वेळ नाही काळ ना, तिन्ही त्रिकाळा लागला

पुसटसा चाटून गेला पदर गालाला तिचा
हात माझा आज पहिल्यांदा अभाळा लागला

धर जरा तू धीर ह्रदया अंतरी हासू नको
अजूनही नाही सुखांचा ठोकताळा लागला

काय तू हरपून राधे  धावसी यमुनातिरी
आजही मागे लुटारु काय काळा लागला?

रक्त धमन्यातून वाहे विक्रमांचेही तरी
भारताच्या का भविष्यालाच टाळा लागला?

हे प्रभो, महाराष्ट्रदेशा, मानिले तुजला धनी
गंध मातीचा तुझा जेव्हा कपाळा लागला

- स्वानंद

Wednesday, June 19, 2013

प्यादे वजीर झाले

अधिकार भोगण्याला पुरते अधीर झाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

एकेक सोबत्याची तोडून बंध नाती
विसरुन रंग अपला, विसरुन जातपाती
ते एकटे निघाले, झेलीत बाण-भाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

चतुरंग सैन्य पुढती नाही भीती जराशी
दृष्टी अधीर झाली ती आठव्या घराशी
सा-याच रीतभाती ओलांडुनी निघाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

हेवा कुणास वाटे, कोणी म्हणे शहाणा
कोणी रगेल माने, गर्विष्ठ स्वार्थबाणा
ना ऐकले कुणाचे, प्यादे पुढे निघाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

चर्चा जनात रंगे "ते बंडखोर आहे"
जो तो वजीर होण्या लावीत जोर आहे
जमले परि तयाला इतरां उशीर झाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

- स्वानंद

Wednesday, May 22, 2013

कला


प्रतिबिंब मानसीचे आकार मूर्त घेते
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

रंगात कुंचल्यांना शब्दात भावनांना
भिजवून चिंब करते हळुवार काळजांना
ती नकळता कुणाच्या जुळवी अनाम नाते
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

कोणी म्हणे समाधी वेडेपणा कुणासी
ते साध्य जीवनाचे की सोबती प्रवासी ?
सामर्थ्य दुःखितांना, वैराग्य विक्रमाते 
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

बंदी खुळ्या जिवांना स्वातंत्र्य 'ही'च देते
अतृप्त जाणींवांना मोक्षापल्याड नेते
जगती 'हिच्या'चसाठी, जगती खरे जगी ते
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

-स्वानंद

अजून फुलांना येतो वास


अजून येती सूर वेणूचे अजूनही का होती भास ?
सुकून गेली जरी पूर्ण पण अजून फुलांना येतो वास

आठवणींची कृष्णा वाहे
संथ शांत जळ वहात आहे
तीरावरती लकेर उठवीत राधेचे नि:श्वास
अजून फुलांना येतो वास

कुठे किनारा कोठे धार
कोठे जीवन धर्मविचार
तुझ्यावाचूनी शून्यच मी रे देहाची आरास
अजून फुलांना येतो वास

मुळी कळेना वेळ न‍ काळ
पळे चालली सांजसकाळ
तू नसताही चराचरातून तुझा मिळे सहवास
अजून फुलांना येतो वास

- स्वानंद