Monday, June 28, 2010

जेव्हा घरासमोरी सखिचि वरात आली

जेव्हा घरासमोरी सखिचि वरात आली
कळ प्राण घेऊ जाया माझ्या उरात आली

मउ ओठ दाबिला तू मिटले टपोर डोळे
मज उमगले क्षणि त्या ज्वानी भरात आली

स्वप्नात पाहिलेली हसरी फुले निमाली
सुकली उदास सुमने अंती करात आली

सरला प्रकाश सरला मउ लोपली नव्हाळी
काळोख जाडभरडा पसरीत रात आली

बेसूर वाटलेले आयुष्य संपताना
का ओळ शेवटाची कंठी सुरात आली

Friday, June 18, 2010

उशीर झाला....

कामे अपूर्ण सारी करण्या उशीर झाला
भवसागरी बुडालो तरण्या उशीर झाला

कंठात आर्त हाक डोळ्यात आर्जवे ही
पाषाण काळजाला झरण्या उशीर झाला

नावा उभ्या कधीच्या यात्रीक ना परंतू
वारा शिडात त्यांच्या भरण्या उशीर झाला

घरदार जिंकले मी मग जिंकले जगाला
इतुका अजिंक्य झालो हरण्या उशीर झाला

आता नकोच स्मरणे गाफील त्या क्षणांची
ज्यावेळि अंतराला स्मरण्या उशीर झाला

मी दाविले कितीही तुज प्रेम अंतरीचे
आता सखे तुला मी वरण्या उशीर झाला

ये ये उदार मरणा मी वाट रे पहातो
वाटू नये मला की मरण्या उशीर झाला