Showing posts with label हास्य. Show all posts
Showing posts with label हास्य. Show all posts

Tuesday, August 10, 2010

बनविले मामा कधी

हुंदक्यांना रोखणे जमलेच ना आम्हा कधी
ना मिळाली प्रेयसी अन आमुच्या प्रेमा कधी

रोज जातो राउळी अन ठेवतो मी दक्षिणा
हात जोडून मागतो मी प्रेयसीची प्रार्थना
खंड ना एका दिसाचा रोजच्या नेमा कधी

ये कधी युवती कुणी हासून लाजून बोलते
नाव पुसता मात्र मागे ‘सौ’ तिच्या हो लागते
आमुचे ’सौ’भाग्य ना ये आमुच्या कामा कधी

हाय जगतो जीव का हे ना कळे माझे मला
जात स्त्रीची बेरकी कळलीच ना वेड्या तुला
बांधली राखी कुणी तर बनविले मामा कधी

-स्वानंद

Sunday, May 20, 2007

कार्यालयात वारंवार दिसणा~या युवतीस..........

तुला पाहण्यापासून मला रोखणार तरी कोण ?
इथे माझाच नाही ताबा मझ्या डोळ्यांवरती दोन...

नकळत माझ्या वळती केव्हा तुझ्याकडे ते मज न कळे
उष्ण तव्यावर जैसे लोणी तैसे माझे मन वितळे
आडथळे मग कुठले उतरी अचूक साधला जाई कोन
आणि उरतच नाही ताबा माझ्या डोळ्यांवरती दोन...

नशा रुपाची तुझ्या वाहते डोळ्यातून माझ्या ह्रदयी
आठवते ना मग धूरकांडी मदिरा प्याला वा सुरई
तुला पहावे हेच व्यसन मग आनंदाला येई लोण
आणि उरतच नाही ताबा माझ्या डोळ्यांवरती दोन...

कधी तुझी ती नजरभेट गे अचूक करी घायाळ मला
तुझिया एका भेटीसाठी प्राशीन सखये हलाहला
कसे कळावे तुला गूज हे सदैव हाती तुझिया फोन
हेवा वाटत राही त्याचा डोळ्यांना या माझ्या दोन...

तुला पाहण्यापासून मला रोखणार तरी कोण ?
इथे माझाच नाही ताबा मझ्या डोळ्यांवरती दोन...