Showing posts with label शृंगार. Show all posts
Showing posts with label शृंगार. Show all posts

Friday, July 8, 2011

का गडे झुकल्या पापण्या खाली?

का गडे झुकल्या पापण्या खाली?
गोरट्या गाला का चढे लाली

रंग संध्येचे त्या अनंताने
रेखिले भोळ्या लाजर्‍या गाली

मंद सुटलेला केशरी वारा
गंध उधळीतो कुंद भोताली

भेटलो होतो बोलण्यासाठी
शब्द विरलेले थांबली बोली

दूर ऐकू ये राऊळी घंटा
तेथ ती मीरा कृष्ण ओवाळी

- स्वानंद

Wednesday, March 30, 2011

बोलू नकोच काही....

माझ्या मनात आहे तुझिया मनात आहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

शब्दामधून नाही मज शक्य सांगणे ते
जन्मात एकदा ही सौभाग्य-भेट होते
हा विरह जीवघेणा दोघांस जाचताहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

ओठावरील भाषा मौनाळली तरीही
डोळ्यामधून माझ्या वाचून भाव घेई
दाटे उरी तुझ्या ते माझ्या उरात आहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

झुरतो तुझ्याविना मी येशील गे कधी तू
पुरते लुटून मजला घेशील गे कधी तू
त्या रेशमी लुटीची मी वाट पाहताहे
बोलू नकोच काही मज सर्व ज्ञात आहे

- स्वानंद

Tuesday, August 10, 2010

गर्दी तुझ्या क्षणांची दाटे सुनी सुनी

मैफल तुझ्याविना रे वाटे सुनी सुनी
छेडे सतार जेव्हा बोटे सुनी सुनी

चैतन्य सर्व लोपे विरहात राजसा
बस अंतरात ज्वाला पेटे सुनी सुनी

मी ओळखून आहे ती पाउले तुझी
पण वाट अंत पाहे भेटे सुनी सुनी

विणुनी रुपेर स्वप्ने हा दिवस संपला
उरली उदास रजनी फाटे सुनी सुनी

अश्रू मला धरेना डोळ्यात रोखूनी
गर्दी तुझ्या क्षणांची दाटे सुनी सुनी

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Sunday, August 8, 2010

होईल कधी गे भेट ?

होईल कधी गे भेट ?
कासावीस हा प्राण कधीचा कंठाशी ये थेट

ओझरते मी तुला पाहिले
थार्यावरचे चित्त उडाले
मनोरथांचे चढले इमले
क्षणात स्वप्ने किती पाहिली कितीक रचले बेत

ओठांवरती शब्द न येती
मनात पण पाझरते प्रीति
परतून जेव्हा पडेल गाठी
नकोस लाजू दे डोळ्यांनी एकतरी संकेत

एकच आशा येशील गे तू
जुळतील धागे जुळतील हेतू
केव्हा होईल भेट परंतू
अधीर आतुर ह्रदय बिचारे तुझीच चाहूल घेत

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

Monday, August 2, 2010

मधुचंद्र

आता झाली वेळ फुलांची
नभात दाटे नीळ फुलांची

दिवस फुलांचा रात्र फुलांची
सांज खुळी वेल्हाळ फुलांची

दिठी फुलांची मिठी फुलांची
उरि हुरहुर ओढाळ फुलांची

श्वास फुलांचे भास फुलांचे
वाणीही गंधाळ फुलांची

मीहि फुलांचा तूहि फुलांची
गळ्यात विलसे ओळ फुलांची

कोठून येतो सुगंध हलके
कवितेची या नाळ फुलांची

Tuesday, July 27, 2010

चांदणे...

झुलते मनात माझ्या हळुवार चांदणे
अंधारल्या जिवाला आधार चांदणे

रात्री लपेटूनी तू आलीस घनतमा
गात्री तुझ्या झळाळे शृंगार चांदणे

नजरेत वीज ओली श्वासात चंद्रमा
ह्रदयात नादणारा झंकार चांदणे

प्यालो मिळून दोघे बेहोष होउनी
उदरात घे तुझ्या ते आकार चांदणे

तारा विझावल्या ये पूर्वेस लालिमा
त्या केशरात न्हाते अल्वार चांदणे

Wednesday, July 7, 2010

नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

भाग्य दिसते जे समोरी ते मला लाभेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

नाहि दिसली ती कधी मग भेटणे अमुचे कुठे?
भाबड्या जीवास का मग आतुनी आशा फुटे?
काय पडली भूल ही माझ्या मना उमगेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

का सकाळी भास होतो पैंजणांचा अंगणी?
अन् चुलीच्या जवळ वाजे काकणांची किणकिणी
चिमूटभर त्या कुंकवाचे भाग्य मग उजळेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

मांडले शब्दात मी ह्रदयात जे हुंकारले
फक्त आशा एक की मजला दिसावी पाउले
या मनीचे हे मनोगत त्या मनी पोचेल का?
नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?