Saturday, June 29, 2013

सारखे बोलावयाचा काय चाळा लागला ?

सारखे बोलावयाचा काय चाळा लागला ?
वेळ नाही काळ ना, तिन्ही त्रिकाळा लागला

पुसटसा चाटून गेला पदर गालाला तिचा
हात माझा आज पहिल्यांदा अभाळा लागला

धर जरा तू धीर ह्रदया अंतरी हासू नको
अजूनही नाही सुखांचा ठोकताळा लागला

काय तू हरपून राधे  धावसी यमुनातिरी
आजही मागे लुटारु काय काळा लागला?

रक्त धमन्यातून वाहे विक्रमांचेही तरी
भारताच्या का भविष्यालाच टाळा लागला?

हे प्रभो, महाराष्ट्रदेशा, मानिले तुजला धनी
गंध मातीचा तुझा जेव्हा कपाळा लागला

- स्वानंद

Wednesday, June 19, 2013

प्यादे वजीर झाले

अधिकार भोगण्याला पुरते अधीर झाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

एकेक सोबत्याची तोडून बंध नाती
विसरुन रंग अपला, विसरुन जातपाती
ते एकटे निघाले, झेलीत बाण-भाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

चतुरंग सैन्य पुढती नाही भीती जराशी
दृष्टी अधीर झाली ती आठव्या घराशी
सा-याच रीतभाती ओलांडुनी निघाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

हेवा कुणास वाटे, कोणी म्हणे शहाणा
कोणी रगेल माने, गर्विष्ठ स्वार्थबाणा
ना ऐकले कुणाचे, प्यादे पुढे निघाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

चर्चा जनात रंगे "ते बंडखोर आहे"
जो तो वजीर होण्या लावीत जोर आहे
जमले परि तयाला इतरां उशीर झाले
चुकवीत उंट घोडे, प्यादे वजीर झाले

- स्वानंद

Wednesday, May 22, 2013

कला


प्रतिबिंब मानसीचे आकार मूर्त घेते
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

रंगात कुंचल्यांना शब्दात भावनांना
भिजवून चिंब करते हळुवार काळजांना
ती नकळता कुणाच्या जुळवी अनाम नाते
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

कोणी म्हणे समाधी वेडेपणा कुणासी
ते साध्य जीवनाचे की सोबती प्रवासी ?
सामर्थ्य दुःखितांना, वैराग्य विक्रमाते 
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

बंदी खुळ्या जिवांना स्वातंत्र्य 'ही'च देते
अतृप्त जाणींवांना मोक्षापल्याड नेते
जगती 'हिच्या'चसाठी, जगती खरे जगी ते
सर्वस्व जीवनाचे अंती कलाच होते

-स्वानंद

अजून फुलांना येतो वास


अजून येती सूर वेणूचे अजूनही का होती भास ?
सुकून गेली जरी पूर्ण पण अजून फुलांना येतो वास

आठवणींची कृष्णा वाहे
संथ शांत जळ वहात आहे
तीरावरती लकेर उठवीत राधेचे नि:श्वास
अजून फुलांना येतो वास

कुठे किनारा कोठे धार
कोठे जीवन धर्मविचार
तुझ्यावाचूनी शून्यच मी रे देहाची आरास
अजून फुलांना येतो वास

मुळी कळेना वेळ न‍ काळ
पळे चालली सांजसकाळ
तू नसताही चराचरातून तुझा मिळे सहवास
अजून फुलांना येतो वास

- स्वानंद

Tuesday, March 27, 2012

एका वठलेल्या वृक्षाचे मनोगत

नका वापरु सरणासाठी मजला माझ्या मृत्युनंतर
नका करु रे पेट्या, खुर्च्या अथवा मेजासाठी वापर

अमिष दाखवू नका मला रे मृत्युनंतर मोक्षाचे
दोन शब्द घ्या ऐकून तुम्ही वठलेल्या या वृक्षाचे

सोडून जाता जीवच माझा नश्वरशा या देहाला
करुनी 'खिडकी' बसवा त्याला 'शूरविरा'च्या गेहाला

आतुर त्याची असेल गृहिणी प्रेमसुगंधा मृगनयना -
भेटीसाठी पतिराजाच्या, केव्हा तो येईल सदना?

पुनः पुन्हा येऊन खिडकीशी चाहूल त्याची घेत असे
प्रेमपाखरु अधीर झाले भेटीचे तर त्यास पिसे

कुठला येतो तिचा पति जो गेला मोठ्या युद्धाला
मनात होऊन जाणीव याची व्यथित होतसे ती अबला

खिडकीत येऊनी पहात राही पथाकडे ती कठोरश्या
वहात जाती अश्रूंमधूनी तिच्या मनीच्या आकांक्षा

विरही त्या जिवाला माझा होईल तेव्हा आधार
त्या तृप्तीने कृतार्थ होईल माझे वठले कलेवर

- स्वानंद

Wednesday, February 29, 2012

जाम!

करमत नाही तिज आता माझ्यावाचून थोडेही
माझेच व्यसन तिज लागे ना दारु मज सोडे ही

ती पूर्ण भिने माझ्यात मी खोलखोलसा जातो
कोणात बुडाले कोण ना सुटते मज कोडेही

ही काय तुझ्या स्पर्शाने माझ्यावर जादू केली
अपसूक सुटाया लागे अश्रूंचे गाठोडेही

देतसे उन्हा हुलकावा सर श्रावणवेडी ओली 
ते जुळवून घ्याया जाते झिडकारुन त्या तोडे ही

मी पवित्र मानत आलो कोरड्याच अस्तित्वाला
चुकवित रोज मी आलो तीर्थांचे शिंतोडेही


- स्वानंद

Tuesday, January 31, 2012

वाग्देवीस...

जरी आज अनावर झोप, परत ती खेप, लेखणी हाती
अन्यथा घडावे पाप, भरावे माप, सुटे सांगाती

हा कसा गडे तव हट्ट, घातला घाट, नव्या कवितेचा
किती किती जुळवले शब्द, घातले वाद, सोडवित पेचा

परि जुळून नाही येत, एकही नीट, ओळ ती साधी
कागदा लागला ढीग, शाईचे ओघ, वाचती यादी

अस्वस्थ जाहला आज, तुम्ही कविराज, उतरली बाधा
का रुसले सारे शब्द, न ये प्रतिसाद एकही साधा

पांगला अता अभिमान, उतरली शान, फुकाची माझी
किती अजून मी वैतागू, आणि तव मागू, क्षमा गे आजी?

- स्वानंद

Saturday, December 31, 2011

प्रीतपूर्ती

आवेग वाढला बांध फुटे तो आज
डोळ्यांतील आता उडून गेली लाज
अंगाला भिडले अंग सोडूनी रीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

ही कुठली आली झिंग कळेना दोघा
हा कुठला त्यांना बांधून ठेवी धागा
गुंफले तयांनी शब्द सुरांनी गीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

क्षण निघून गेले उरे भावना हाती
रुजवली जिने आजन्मांची ही नाती
हा विरहच आता ह्रदयांना जाळीत
नि पूर्ण जाहली दोघांची ती प्रीत

विरहातच फुलते प्रीति या जगतात
विरहातच जगती प्रेमिक जगि दिनरात
विरहात दरवळे मधु-मिलन संगीत
परिपूर्ण होतसे दोघांचीही प्रीत

- स्वानंद

Sunday, November 20, 2011

दोन बालगीते

-१-
समुद्रावर गेलो फिरायला म्हणून
लाटांवर चमकत होतं ऊन

दूरवर दिसली खेळकर होडी
लाटांवर डुले ती थोडी थोडी

जवळ ती येताच सरला भास
मेलेल्या माश्यांचा आला वास

-२-
ताईच्या गाडीवर मागं बसून
फिरायला निघालो नटूनथटून

ऐटीत सोडून मागे पाय
उलटा बसलो तर म्हणते काय -

"हलू नको, डुलू नको, करु नको खोडी"
मग कळलं बिच्चारीला येतच नाही गाडी

- स्वानंद

Saturday, October 1, 2011

प्रीतिसंगम

पेंगुळलेल्या शांत नदीवर किरण रविचे पडती जेव्हा
लहरीतून चैतन्य सळसळे, हवेत येतो नवा ताजवा

स्थितप्रज्ञ त्या अचल डोंगरी मेघ थांबती थोडे थोडे
जणू चराया तिथे थांबले शुभ्र, सुरांचे, सुनील घोडे

हिरव्या कुरणातूनी वाहतो प्रकाश अविरत सर्व दिशांनी
प्रवाहास त्या बांध घालण्या जागृत होती पक्षी प्राणी

सॄष्टी झटके जीर्ण पांघरुण जुनाटल्या निस्तेज निशेचे
किलबिल झडते सा-या गगनी स्वागत करण्या नव्या उषेचे

पार उधळला गुलाल वरती आकाशाच्या छता टेकतो
ठिणगीमधूनी आनंदाच्या गगनामध्ये सूर्य पेटतो

तेजा प्राशुनी पुलकित होती सह्यकन्यका अमृतवाही
पोक्त थोरली 'कृष्णा', अवखळ स्वैर 'कोयना' मिसळून जाई

दो भगिनींची अभंग माया जगात दुसरी नाही यासम
साक्ष देत 'करहाटक' ग्रामी अजून आहे 'प्रीतिसंगम'

- स्वानंद

Saturday, September 17, 2011

बेडी...

या झोक्यावर त्या झोक्यावर थोडेसे खेळून
लेक चिमुकली दमून बसली बाजूला येऊन

धर्मबिंदू ये भाळावरती थोडी घाबरली ती
अवतीभवती मुळी न दिसती ओळखीच्या आकृती

"कोठे आई, कोठे बाबा गेले मज टाकून?"
डोळे झाले टचकन ओले गळा येई दाटून

क्षणात आले बाबा मागून हळू झाकती डोळे
त्यांच्या हाता लागे दहिवर विरही ओघळलेले

कवेत त्यांच्या शरासारखी घुसे लेक ती वेडी
दुरुन आई पहात राही 'वात्सल्याची बेडी'

- स्वानंद

Tuesday, August 30, 2011

मना वर्तमानात तू रे जगावे

अघोरी असो वा असो भाग्यशाली
नसे 'भूतकाळा'स कोणीच वाली
फुका आठवांनी कशाला झुरावे?
मना वर्तमानात तू रे जगावे

नसे शाश्वती हाय पुढल्या क्षणाची
उगा भिस्त का दाविसी रे युगांची?
"अता वाटते ते अताची करावे"
मना वर्तमानात तू रे जगावे

टळे वेळ कोणा कुण्या कारणाने
गळे की पहा तो क्षणाने क्षणाने
रिते पात्र अपूले कसे तू भरावे?
मना वर्तमानात तू रे जगावे

- स्वानंद

Sunday, August 14, 2011

सारखं वाटतयं...

रणरणती दुपार मनातही उन्हं
तापलेली धरती तापलेली मनं
सरसरुन अवचित यावा शिडकावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

ढगांच्या सावल्या पडाव्यात वरुन
क्षणात ऊन जावं पळून
वा-याचा वारु सुसाट सुटावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

भरुन भरुन यावं आभाळ
विजांचे वाजावे चंदेरी चाळ
सुर्याचा ताप क्षणात विझावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

पावसाची लागलेली कधीची आस
मातीचा यावा पुन्हा सुवास
रिमझिम रिमझिम धाराही नाचाव्या
सारखं वाटतयं पाऊस पडावा

भिजावी शेतं साचावं पाणी
डोंगरापल्याड सप्तरंगी कमानी
रंगांचा तो गोफ ह्रदयात उमटावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

झरझर झरझर झरु दे धार
तहानल्या धरतीच्या जिभा हजार
आतुर कधीची ती घेण्या विसावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

मीही घेईन उडी चिंब भिजवील तो
(बाकी काही नाही, निदान अश्रू तरी लपवील तो)
आठवांचा बांध पावसात फुटावा
सारखं वाटतयं पाऊस पडावा

आला तो आला सोसाट्याचा वारा
तृषार्त देहावर बरसल्या धारा
आतून बाहेरुन ओलावाच ओलावा
सारखं वाटतयं...

- स्वानंद

Saturday, August 13, 2011

मनाचे उसासे मनापाशी

मनाची कवाडे उद्विग्न उदास ।
कशाला मी श्वास घेत आहे ॥

बड्या या घराचे पोकळच वासे ।
मनाचे उसासे मनापाशी ॥

आता ना कुठेही जराही आसरा ।
गोतावळा सारा दुरावला ॥

अंधार बळावे आधार लोपला
'स्वानंद' हरपला 'स्वानंदा'चा ॥

Friday, August 12, 2011

जाम...!

करमत नाही तिज आता
माझ्यावाचून थोडेही
माझेच व्यसन तिज लागे
ना दारु मज सोडे ही

ती पूर्ण भिने माझ्यात
मी खोलखोलसा जातो
कोणात बुडाले कोण
ना सुटते मज कोडेही

Thursday, July 21, 2011

खंत

स्वप्न नाही एकही जमले मला साकारणे
देत गेलो शेवटी मी कारणांना कारणे

चढविला आहे मुलामा हासरा ओठांवरी
काळजाला ना जमे जखमा जुन्या नाकारणे

धावतो पाठीस माझ्या दावतो काठी मला
'काळ' करतो काम त्याचे मेंढरा हाकारणे

-स्वानंद

Sunday, July 10, 2011

तुझी आठवण...

तू जिथे गे तिथे हे ऋतू नाही का?
हासणा-या प्रिये तारका नाही का?
बरसणा-या नभी नाचते वीज का?
हुरहुरीची उरी दाटते सांज का?

ही उदासीन दुनिया सदा सर्वदा
काळजाला कुणी सावरावे इथे?
एक वेड्या जीवासाठी आयुष्य का
वंचनांनी खुळ्या घालवावे इथे?
मात्र अपुल्या क्षणांची जराही तुला
सप्तरंगी सुवासी स्मृती नाही का?

काळजातील कळ गाई गीतातूनी
साद दे तू मला शांतवाया तिला
रात्र सुनी सरे आणि मी एकला
जीव माझा तुझ्यासाठी आतुरला
फक्त डोळ्यातूनी भेटलो कैकदा
त्या दिसांची तुला गे स्मृती नाही का?

- स्वानंद

मूळ गीत: http://www.youtube.com/watch?v=Ac9jPAIOV9Q

Friday, July 8, 2011

का गडे झुकल्या पापण्या खाली?

का गडे झुकल्या पापण्या खाली?
गोरट्या गाला का चढे लाली

रंग संध्येचे त्या अनंताने
रेखिले भोळ्या लाजर्‍या गाली

मंद सुटलेला केशरी वारा
गंध उधळीतो कुंद भोताली

भेटलो होतो बोलण्यासाठी
शब्द विरलेले थांबली बोली

दूर ऐकू ये राऊळी घंटा
तेथ ती मीरा कृष्ण ओवाळी

- स्वानंद

Saturday, June 18, 2011

मुके बोल

दिगंतात विरल्या विराण्या थोरांच्या ।
तुझ्या मुक्या बोलांचा । ठाव कोणा ॥

वरुनी भासतो स्वस्थता आराम ।
अंतरी जखम । भळभळे ॥

सोसवेना ताण देह विरलेला ।
नाही शिवायाला । ठिगळही ॥

स्वानंदा तू आता स्वधर्माला ताडी ।
उधळणे सोडी । चौखुरांनी ॥

- स्वानंद

Thursday, June 2, 2011

तुला सांगायचे राहिले..

प्रिये,

तुला सांगायचे राहिले..
काल चालत घरी येत होतो..
तेव्हा वाटेत..
देव भेटला..
म्ह्णाला "मी प्रसन्न झालोय, काय पाहिजे ते माग तुला?"

मी मनात म्हटलं
"देवा,
तू प्रसन्न झाला आहेस,
हे तिने होकार दिला
तेव्हाच समजले होते"
:)
"काय पाहिजे"
देव विचारतच होता

त्याला म्हटले...
"आता काही करायचेच असेल
तर एक काम कर....
तुला हवे ते रुप घेता येते म्ह्णे
मग माझेच रूप घे...

आणि जा माझ्या प्रियाजवळ
तिला सांग मी आलोय...

तिला किती आनंद होईल सांगू?
काय करु काय नको असे होईल तिला...

भांबावेल, गोंधळेल...
पण तू तिचे डोके शांतपणे तुझ्या खांद्यावर ठेव...
पाठीवरून मायेने हात फिरव...
आणि तिचे मन भरेपर्यंत पाहून घेऊ देत तिला..
तिचा बांध फुटेल कदाचित...

रडू दे तिला...
मनसोक्त...

तू आधार आणि माया दोन्ही देत रहा....

बस..एवढंच कर...
बाकी काही नको..

- स्वानंद