Thursday, May 19, 2011

आयुष्य पार सरलेले...

तडजोडी करता करता
आयुष्य पार सरलेले
स्वप्नांची वाफ उडाली
कोरडे-शुष्क उरलेले

आता न वळे पाऊल
वाटेवरती गाण्यांच्या
कंठात रुते आवाज
ओठही बंद शिवलेले

हे दुःख आत ना मावे
बाहेर येतही नाही
पाहून पोरकी स्वप्ने
डोळ्यांशी डबडबलेले

माझे मन मोठे कोडे
सुटता न सुटे थोडेही
बाहेर दिसे स्वच्छंदी
आतूनी बुरसटलेले

खांद्याला घेऊन ओ़झी
मसणात रोजची वारी
एकेका दगडा खाली
एकेक स्वप्न पुरलेले

- स्वानंद

Saturday, May 14, 2011

वेडेपणा...

काळीज माझे गुंतले अन भोवला वेडेपणा
’शहरात या तू एकटा!’ म्हणला मला वेडेपणा

रात्री कुणी हाकारले ओळख मला ना लागली
मी बोललो ’तू कोण रे?’ तो बोलला ' वेडेपणा!'

एकांत हा दःखी करे वणवण जिवाची ना टळे
आम्ही पुरे कंटाळलो कंटाळला वेडेपणा

माझ्या रथाला हाकता तू सोबती तू सारथी
ना माहिती आहेस तू माझ्यातला - वेडेपणा!

साकी विचारे सारखी ’आहेस का रे तू सुखी?’
ओलावल्या दुःखातुनी मी कोरला वेडेपणा

स्वप्नात माझ्या सारखा तो चंद्र येतो एकटा
माझ्या परी त्याच्या जगी आकारला वेडेपणा

- स्वानंद

प्रेरणा:
http://www.youtube.com/watch?v=qH5q-v8tvF4

Friday, May 13, 2011

अनोळखी...

देऊ नको मला तू नावे अनोळखी
का रोज मी स्वतःला व्हावे अनोळखी?

मी त्यागिले सुखाने सन्मित्र सोयरे
मागून सावली का धावे अनोळखी?

गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे
त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'?

या रोजच्याच वाटा मी चालतो तरी
वाटेत लागणारी गावे अनोळखी

वैशाख तापलेला वणवा उरी जळे
ओठात गीत ओले यावे अनोळखी

- स्वानंद