Saturday, October 1, 2011

प्रीतिसंगम

पेंगुळलेल्या शांत नदीवर किरण रविचे पडती जेव्हा
लहरीतून चैतन्य सळसळे, हवेत येतो नवा ताजवा

स्थितप्रज्ञ त्या अचल डोंगरी मेघ थांबती थोडे थोडे
जणू चराया तिथे थांबले शुभ्र, सुरांचे, सुनील घोडे

हिरव्या कुरणातूनी वाहतो प्रकाश अविरत सर्व दिशांनी
प्रवाहास त्या बांध घालण्या जागृत होती पक्षी प्राणी

सॄष्टी झटके जीर्ण पांघरुण जुनाटल्या निस्तेज निशेचे
किलबिल झडते सा-या गगनी स्वागत करण्या नव्या उषेचे

पार उधळला गुलाल वरती आकाशाच्या छता टेकतो
ठिणगीमधूनी आनंदाच्या गगनामध्ये सूर्य पेटतो

तेजा प्राशुनी पुलकित होती सह्यकन्यका अमृतवाही
पोक्त थोरली 'कृष्णा', अवखळ स्वैर 'कोयना' मिसळून जाई

दो भगिनींची अभंग माया जगात दुसरी नाही यासम
साक्ष देत 'करहाटक' ग्रामी अजून आहे 'प्रीतिसंगम'

- स्वानंद

2 comments:

इंद्रधनु said...

>>स्थितप्रज्ञ त्या अचल डोंगरी मेघ थांबती थोडे थोडे
जणू चराया तिथे थांबले शुभ्र, सुरांचे, सुनील घोडे

Mastach...

श्रिया (मोनिका रेगे) said...

अप्रतीम! सुंदरच लिहिली आहेस कविता...परत परत वाचते आहे...तरीही वाचावीशी वाटते आहे. शब्द आणि कल्पना सुंदर मेळ! डोळ्यासमोर चित्र उभे राहिले....