Tuesday, March 27, 2012

एका वठलेल्या वृक्षाचे मनोगत

नका वापरु सरणासाठी मजला माझ्या मृत्युनंतर
नका करु रे पेट्या, खुर्च्या अथवा मेजासाठी वापर

अमिष दाखवू नका मला रे मृत्युनंतर मोक्षाचे
दोन शब्द घ्या ऐकून तुम्ही वठलेल्या या वृक्षाचे

सोडून जाता जीवच माझा नश्वरशा या देहाला
करुनी 'खिडकी' बसवा त्याला 'शूरविरा'च्या गेहाला

आतुर त्याची असेल गृहिणी प्रेमसुगंधा मृगनयना -
भेटीसाठी पतिराजाच्या, केव्हा तो येईल सदना?

पुनः पुन्हा येऊन खिडकीशी चाहूल त्याची घेत असे
प्रेमपाखरु अधीर झाले भेटीचे तर त्यास पिसे

कुठला येतो तिचा पति जो गेला मोठ्या युद्धाला
मनात होऊन जाणीव याची व्यथित होतसे ती अबला

खिडकीत येऊनी पहात राही पथाकडे ती कठोरश्या
वहात जाती अश्रूंमधूनी तिच्या मनीच्या आकांक्षा

विरही त्या जिवाला माझा होईल तेव्हा आधार
त्या तृप्तीने कृतार्थ होईल माझे वठले कलेवर

- स्वानंद

3 comments:

Unknown said...

स्वानंद, त्या वृक्षाला जगण्यासाठी कष्टही करता येत नाही रे!!!!!!! पण तू जे काही "एका वठलेल्या वृक्षाचे मनोगत" साकारले आहेस ते अतिशय सुंदर आहे. त्या वृक्षाकडून मे तुझे खूप आभार मानतो कि त्याच्या मनाच्या व्यथा तू समोर मांडल्यास.....

इंद्रधनु said...

Awesome.... Kalpanach khup sundar ahe...

श्रिया (मोनिका रेगे) said...

किती सुंदर कविता! स्वानंद छान लिहितोस....