Wednesday, March 9, 2011

अजून राधा....

यमुनेचे जळ कंप पावते ह्रदय तिचे धडधडते रे
मुके हुंदके कानी पडती अजून राधा रडते रे

कशास रचला रासरंग तू, सूर वेणूचे आळवले
नंदनवन का माझ्यासाठी यमुनातीरावर रचले?
कदंब-शाखेवरची कोकीळ झोपेतच थरथरते रे

मन लोणी मम तन लोणी, नयनामधले द्रव लोणी
तू गेल्यावर लपून आता चोरायाचे ते कोणी
तू ना येसी, वेडे मन पण तुझीच चाहूल घेते रे

रंग फिके या होळीचे शाम तुझ्या रंगापुढती
नयना मधले काजळ वाहे अश्रू सावळे ओघळती
रंगामध्ये तन भिजते मन भिजण्या आतुरते रे

- स्वानंद

प्रेरणा:
http://manmanjusha.blogspot.com/2011/02/blog-post_18.html#axzz1G93ON3Ge

2 comments:

Anujna said...

"मन लोणी मम तन लोणी, नयनामधले द्रव लोणी
तू गेल्यावर लपून आता चोरायाचे ते कोणी"

सुंदर!

:)

Sakhi said...

Awesome shona :)