Thursday, August 5, 2010

राधिकेची आसवे का रोधिती श्यामा कधी ?

हुंदक्यांना रोखणे जमलेच ना आम्हा कधी
ना मिळाली प्रेयसी अन आमुच्या प्रेमा कधी

मी उन्हे कुरवाळली अंगात धग ती राहिली
चिमुटभर ना सावली मग लाभली जन्मा कधी

सोडुनी ती वाट जाते कोरडा मी राहतो
धार ओली स्पर्शली ना रापल्या रोमा कधी

पूस डोळे जाण वेड्या प्रेम मागे आहुती
राधिकेची आसवे का रोधिती श्यामा कधी ?

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

No comments: