Tuesday, August 31, 2010

मंगलवार्ता कळेल आता

मंगलवार्ता कळेल आता
भाग्य रेशमी मिळेल आता

एकटेपणा जेथे थिजला
एकरुपता रुळेल आता

या ह्रदयीचा त्या ह्रदयीला
स्नेह आपसुक जुळेल आता

दुडुदुडु धावत अंगणातुनी
बाळमुकुंदा पळेल आता

रंगामधुनी रांगोळीच्या
हात चिमुकला मळेल आता

कल्पतरुंची बने दावण्या
वाट सुखाने वळेल आता

अमृतधारा भिजवतील मन
वषार्वच तो छळेल आता

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

No comments: