Tuesday, September 14, 2010

आभाळ लागले मिळू

आता कुठे उजाडले आभाळ लागले मिळू
सविता प्रकाश लागला या चांदण्यात विरघळू

वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला
तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू

येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये
प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू

ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला
माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू

नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे
एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

No comments: